Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा मुंडा पुतळ्याभोवती घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप

अंबाडी (ता. किनवट) : किनवट तालुक्यातील अंबाडी गावात आदिवासी समाजाचे क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याभोवती मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि मातीचे ढिगारे साचले असून परिसर अस्वच्छ झाला आहे. महापुरुषांच्या स्मारक परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुतळ्याच्या चौथऱ्याभोवती कचरा, सुकलेला पालापाचोळा व इतर घाण साचलेली असून त्यामुळे परिसराचे सौंदर्यही कमी झाले आहे. महापुरुषांच्या स्मारकाला शोभेल अशी स्वच्छता आणि देखभाल करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेषतः राष्ट्रीय सण, जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी येथे अनेक नागरिक अभिवादनासाठी येतात. मात्र अशा अस्वच्छ वातावरणामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित ठिकाणी नियमित साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, अंबाडी ग्रामपंचायतीने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पुतळा परिसराची स्वच्छता करावी तसेच भविष्यात नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.