Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी समाजाची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विकृतावर कारवाई करा; किनवट पोलीस ठाण्यात सकल आदिवासी समाजाचे निवेदन

आदिवासी समाजाची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विकृतावर कारवाई करा; किनवट पोलीस ठाण्यात सकल आदिवासी समाजाचे निवेदन
किनवट:
आदिवासी समाजाचा सार्वजनिकरित्या अपमान करण्याच्या उद्देशाने वक्तव्य करून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाची मोठ्या प्रमाणावर बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध किनवट येथे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या विकृत प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज 'सकल आदिवासी समाज' बांधवांच्या वतीने किनवट पोलीस कार्यालयात एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आणि संबंधित दोषीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने आदिवासी समाजाच्या सन्मानाला आणि भावनांना ठेच पोहोचवणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एवढेच नव्हे तर हा जाणीवपूर्वक केलेला अपमान सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर प्रसारित करून समाजाची जागतिक पातळीवर बदनामी करण्याचा प्रयत्न केला. 
या कृत्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज किनवट पोलीस स्टेशन गाठत समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली व प्रशासनाचा निषेध केला. 

"आदिवासी समाजाच्या अस्मितेशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना समाजात थारा दिला जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ गजाआड करावे," अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याप्रसंगी सकल आदिवासी समाजाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. पोलिसांनी सदर निवेदनाचा स्वीकार केला असून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.