Ticker

6/recent/ticker-posts

किनवट–माहूरमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा : आ. भीमराव केराम

किनवट–माहूरमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा : आ. भीमराव केराम

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाण्याऐवजी आभाळाकडे आस; मुख्यमंत्र्यांकडे भावनिक आवाहन

किनवट : किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघातील सध्याची पावसाची परिस्थिती गंभीर असून, अनेक भागांत पावसाअभावी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे किनवट–माहूर तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

किनवट–माहूर हा डोंगराळ, दुर्गम आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेला भाग आहे. यंदा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
पिकांची परिस्थिती बिकट झाल्यास शेतकऱ्यांसमोर कर्ज, शेतीचा वाढता खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांसारखी आव्हाने उभी राहू शकतात. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
आमदार केराम यांनी किनवट व माहूर तालुक्यांतील पर्जन्यमान, पिकांची प्रत्यक्ष स्थिती, जमिनीतील ओलावा, पाणी उपलब्धता आणि पीक नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच दुष्काळाचे निकष लागू करून दोन्ही तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, पीक विम्याचा लाभ, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“किनवट–माहूरच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण शासन दरबारी आवाज उठवत राहू. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय अपेक्षित आहे,” असे आ. केराम यांनी म्हटले आहे.