Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक आदिवासी दिनानिमित्त किनवट बस डेपोतील बससेवांना “वीर बाबूराव शेडमाके एक्सप्रेस” व “गोंडवाना एक्सप्रेस” नाव देण्याची मागणी

किनवट–चांदा व किनवट–नागपूर एसटी बससेवांना आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने नामकरण करा

नगरसेवक संतोष मरसकोल्हे  यांचे विभाग नियंत्रकांना निवेदन; ‘वीर बाबुराव शेडमाके एक्सप्रेस’ व ‘गोंडवाना एक्सप्रेस’ नामकरणाची मागणी
(किनवट,): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून नियमित सुरू असलेल्या किनवट–चांदा (चंद्रपूर) आणि किनवट–नागपूर या महत्त्वाच्या एसटी बससेवांना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारी नावे देण्यात यावीत, अशी मागणी किनवट नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष मरसकोल्हे  यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
किनवट, माहूर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यापारी तसेच विविध सामाजिक व धार्मिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी या दोन्ही बससेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या बससेवांना स्थानिक आदिवासी इतिहास आणि अस्मितेशी जोडणारे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
किनवट–चांदा (चंद्रपूर) एसटी बससेवेला आदिवासी स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने ‘वीर बाबुराव शेडमाके एक्सप्रेस’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. वीर बाबुराव शेडमाके यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि भावी पिढीला त्यांच्या संघर्षाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच किनवट–नागपूर एसटी बससेवेला ‘गोंडवाना एक्सप्रेस’ असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. किनवट–नागपूर हा मार्ग गोंडवाना प्रदेशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे प्रतिनिधित्व करणारा असल्याने या बससेवेला ‘गोंडवाना एक्सप्रेस’ हे नाव योग्य ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून या नामकरणामुळे गोंडवाना संस्कृती, इतिहास आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेला योग्य सन्मान मिळेल,’ असा विश्वास नगरसेवक संतोष मरसकोल्हे  यांनी व्यक्त केला आहे.
या मागणीला परिसरातील नागरिक, प्रवासी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने याबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करून दोन्ही बससेवांचे नामकरण करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी रामेश्वर पराते, राहुल मेश्राम, अरविंद पेंदोर, अनिल कनाके, फुलाजी येरमे, बालाजी सिडाम, गोविंद पेंदोर, संतोष कनाके, हर्षवर्धन कनाके, गोविंद धुर्वे, देवेंद्र कोवे, राम लोखंडे, अरुण मडावी, सुखदेव सलाम, बालाजी मडावी, पवन मडावी, प्रीतम गेडाम, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत