किनवटमध्ये 'डि.व्ही. भालेराव ग्रंथालया'चा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि साहित्याचे गाढे अभ्यासक स्वर्गवासी डी. व्ही. भालेराव (सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक) यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी किनवट शहरात उभारण्यात आलेल्या 'डि.व्ही. भालेराव ग्रंथालया'चा भव्य लोकार्पण सोहळा ९ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. "किनवटसारख्या आदिवासी बहुल भागात हे ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचे संकलन नसून, ती इथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक 'जीवन संजीवनी' ठरेल," असे प्रतिपादन या सोहळ्याचे अध्यक्ष आमदार भीमरावजी केराम यांनी केले.
आमदार भीमराव केराम यांच्या शुभहस्ते या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गेंदाबाई सोपान सूर्यवंशी, मथुराबाई विठ्ठल भोगे आणि नंदाबाई दत्तात्रय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रामप्रसाद तौर, प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. सुभाष ताजणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कराड, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे आणि डॉ. पंजाब शेरे उपस्थित होते.
वडिलांचा वैचारिक वारसा जपण्याचा स्तुत्य उपक्रम
स्व. डी. व्ही. भालेराव हे केवळ एक पोलीस अधिकारी नव्हते, तर ते साहित्याचे व्यासंगी आणि प्रगल्भ वाचक होते. कोरोनाच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या विचारांची श्रीमंती आणि वाचनाचा छंद जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव दीपक भालेराव आणि कन्या प्रा. डॉ. पूजा भालेराव, जावई श्री. व्यंकटेश कुंभार यांनी या ग्रंथालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. भालेराव परिवाराने स्वतः या ग्रंथालयाचा संपूर्ण आर्थिक भार उचलून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ
हे ग्रंथालय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरेल. हे केवळ वाचनालय नसून ते 'विचारांचे विद्यापीठ' व्हावे, असा मानस आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पूजा नंदा दत्तात्रय भालेराव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. धनराज हलवले आणि प्रा. धनराज पेंदोर यांनी केले.
यांनी घेतले परिश्रम
या उपक्रमासाठी दीपक भालेराव,कन्या प्राध्यापक डॉक्टर पूजा नंदा दत्तात्रय भालेराव ,व्यंकटेश कुंभार, आनंद भालेराव, रोशन भालेराव, स्वप्नील भालेराव तसेच 'कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे'चे नितीन मंडाले, नारायण चव्हाण, ॲड. सचिन दारवंडे, आशीर्वाद वासारके, नरेश भंडारे, प्रा. नरेश गेडाम, प्रा. सुशील मेश्राम, राम आत्राम आणि ओम भुसारे यांनी अथक परिश्रम घेतले.
या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, आनंद मच्छेवार, मारोती सुंकलवाड, प्रशांत कोरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पोहरकर, ज्येष्ठ पत्रकार फुलाजी गरड पाटील, प्रकाश कार्लेवाड, नासिर तगाले, शेख अतिफ, राजेश पाटील, ॲड. मिलिंद सरपे, सुशील पाटील, नागनाथ भालेराव, बंटी फड, डॉ. गादेकर सर यांच्यासह किनवटमधील वाचकप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.