Ticker

6/recent/ticker-posts

50 रुग्णांना मिळाली नवी दृष्टी; किनवटच्या आरोग्य शिबिराचा यशस्वी उपक्रम

50 रुग्णांना मिळाली नवी दृष्टी; किनवटच्या आरोग्य शिबिराचा यशस्वी उपक्रम
३५०० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी; मोतीबिंदूच्या 50 रुग्णांवर नागपूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया
किनवट : आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला किनवट-माहूर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून ३५०० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली, तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या ६० रुग्णांवर नागपूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
१४ ऑगस्ट रोजी किनवट येथील कलावती गार्डन येथे या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, या सामाजिक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात नेत्रतज्ज्ञांच्या पथकाने नागरिकांची सखोल नेत्रतपासणी केली. तपासणीदरम्यान मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची निवड करण्यात आली. त्यानंतर संबंधित रुग्णांना नागपूर येथे नेऊन त्यांच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर रुग्णांच्या दृष्टीत सुधारणा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला.
या संपूर्ण आरोग्य उपक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीत प्रतीक केराम तसेच आरोग्यदूत अमन कुंडगीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रुग्णांना नेत्रतपासणीपासून पुढील उपचार व शस्त्रक्रियेपर्यंत आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान, नागपूर येथे संदेश केराम यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णांशी संवाद साधत उपचाराबाबतची माहिती घेतली आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली.
किनवटसारख्या ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा हात पुढे करणारा हा उपक्रम अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरला आहे. ३५०० हून अधिक नागरिकांची तपासणी आणि ६० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया या माध्यमातून या शिबिराने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय पथक, आरोग्य विभाग, प्रतीक केराम, संदेश केराम आरोग्यदूत अमन कुंडगीर, आयोजक टीम व सेवाभावी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.