किनवट : शहरातील विविध भागांत मोकाट तसेच हिंसक कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या कुत्र्यांमुळे धोका निर्माण होत असल्याचे नगरसेवक संतोष किशनराव मरसकोल्हे यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
यासंदर्भात नगरसेवक संतोष मरसकोल्हे यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. शहरातील काही भागांत मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांचा पाठलाग करणे, चावा घेणे तसेच दुचाकीस्वारांच्या मागे धावणे अशा घटना घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नियमांनुसार मोकाट व हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना व कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी नगरसेवक मरसकोल्हे यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.