बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा; गुंडवळमध्ये दहशत
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील घटना; परिक्रमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची गस्त वाढविण्याची मागणी
घराच्या अंगणातच बिबट्याचा हल्ला
गुंडवळ येथील रामा शामराव कांबळे यांच्या घराच्या अंगणात बकऱ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने घराच्या परिसरात प्रवेश करून दोन्ही बकऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये एका बकरीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या बकरीच्या गळ्याला बिबट्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतानाही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाघ, बिबट्या, अस्वलाच्या वावराने चिंता वाढली
माहूर तालुक्यातील जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ, बिबट्या आणि अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच श्री अनुसया माता मंदिराजवळील जंगल परिसरात पट्टेदार वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली होती.
ही घटना ताजी असतानाच आता गुंडवळ परिसरात बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केल्याने वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
परिक्रमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न
दि. २७ व २८ रोजी माहूर गडावर परिक्रमा यात्रेचे आयोजन होत असून या काळात लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. परिक्रमा मार्गालगतच्या जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने यात्रेच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी परिक्रमा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रेस्क्यू टीम तैनात करून गस्त वाढविण्याची मागणी
गुंडवळ परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची घटना तसेच आगामी परिक्रमा यात्रा लक्षात घेता वन विभागाने गुंडवळ परिसरासह संपूर्ण परिक्रमा मार्गावर तातडीने गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन रेस्क्यू टीम तैनात करावी, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथके नियुक्त करावीत आणि ग्रामस्थ व भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुधनाची शासन नियमानुसार तात्काळ पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.