अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी पदनिर्मिती, कर्मचारी भरती व आर्थिक तरतुदीस मान्यता; आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार
किनवट : किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक आकृतीबंध आराखड्यास मंजुरी देत विविध पदांची निर्मिती, कर्मचारी भरती तसेच आवश्यक आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
किनवटसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल भागात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार असल्याने न्यायव्यवस्था नागरिकांच्या अधिक जवळ येणार आहे. या निर्णयामुळे किनवट-माहूर परिसरातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होऊन वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची बचत होणार आहे.
विकासाच्या विविध मागण्यांसाठीही पाठपुरावा
न्यायालयाच्या निर्णयासोबतच आमदार भीमराव केराम यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामध्ये किनवट येथे आदिवासी विद्यापीठ (Tribal University) स्थापन करण्याची मागणी प्रमुख आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.
तसेच VB-GRAM G योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मजूर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे.
आदिवासी भागातील अतिरिक्त दरवाढ कायम ठेवण्याची मागणी किनवट-माहूरसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागात बांधकाम साहित्याची वाहतूक, मजुरी तसेच यंत्रसामग्रीचा खर्च अधिक असल्याने बांधकामांसाठी पूर्वीप्रमाणे १० टक्के अतिरिक्त दरवाढ कायम ठेवावी, अशी मागणी आमदार केराम यांनी केली आहे. दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीची अतिरिक्त दरवाढ रद्द करणारी शासन परिपत्रकातील तरतूद रद्द अथवा स्थगित करून पूर्वीची व्यवस्था कायम ठेवावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
किनवट-माहूर हा आदिवासी, डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक मतदारसंघ आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता आहे. न्यायव्यवस्था, उच्च शिक्षण, शेती, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही आमदार भीमराव केराम यांनी दिली. न्यायालयामुळे नागरिकांची मोठी सोय
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामुळे किनवट-माहूरमधील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून वेळ व आर्थिक खर्चाची बचत होणार आहे.