किनवट : किनवट शहरातील विविध भागांसह रामनगर प्रभागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धोकादायक विद्युत तारा व जीर्ण खांबांची तातडीने दुरुस्ती अथवा बदल करण्याची मागणी नगरसेवक संतोष किसनराव मरसकोल्हे यांनी महावितरणकडे केली आहे.
याबाबत नगरसेवक मरसकोल्हे यांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी महावितरणच्या किनवट कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. किनवट शहरातील विविध भागांमध्ये तसेच रामनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारा खाली व विस्कटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.
विद्युत तारांलगत झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तसेच काही ठिकाणी विद्युत खांब जुने, जीर्ण व वाकलेले झाल्याने वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे किनवट शहरातील तसेच रामनगर प्रभागातील विस्कटलेल्या विद्युत तारा सरळ करून व्यवस्था सुरळीत करावी, विद्युत तारांना लागून वाढलेल्या झाडाझुडपांच्या व धोकादायक फांद्या तातडीने हटवाव्यात, तसेच जीर्ण, वाकलेले व धोकादायक विद्युत खांब बदलून नवीन व मजबूत खांब बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होणाऱ्या ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून त्यामागील कारणे दूर करावीत. विद्युत वाहिन्या, खांब व इतर विद्युत यंत्रणेची आवश्यक दुरुस्ती व देखभाल करून वीजपुरवठा सुरक्षित करावा. भविष्यात वारंवार वीज खंडित होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी नियमित देखभाल व पाहणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसह सुरळीत वीजपुरवठ्याच्या दृष्टीने महावितरण प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक संतोष किसनराव मरसकोल्हे यांनी केली आहे.