Ticker

6/recent/ticker-posts

माहूर गडावर पंचकोशी परिक्रमा यात्रेत लाखो भाविक सहभागी होणार

माहूर गडावर पंचकोशी परिक्रमा यात्रेत लाखो भाविक सहभागी होणार
२७ ऑगस्टला दशमीच्या दिवशी परिक्रमा यात्रेला प्रारंभ; प्रशासनाकडून नियोजनाला वेग

श्रीक्षेत्र माहूर :
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रसिद्ध शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावर यंदा पंचकोशी परिक्रमा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या यात्रेत लाखो भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. दत्तशिखर संस्थानचे महंत प.पू. श्री. श्री. १००८ धनशंकर उर्फ श्याम भारती महाराज यांच्या आशीर्वादाने दि. २७ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही परिक्रमा यात्रा पार पडणार आहे.

दि. २७ ऑगस्ट रोजी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता परिक्रमा यात्रेला सुरुवात होणार आहे. माहूर गडाला धार्मिक आणि पौराणिक महत्त्व असल्याने या यात्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदाही महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक येण्याची शक्यता आहे.

पंचकोशी परिक्रमा मार्गामध्ये कमंडलू तीर्थ, कालेश्वर महादेव मंदिर, दत्तपादुका दर्शन, आमनाळ येथील महादेव मंदिर, स्वयंभू शांडिल ऋषी मंदिर, गरुड गंगा, मातृतीर्थ मोघळा तलाव, विष्णू कवठी मठ, सिद्ध गया तीर्थ, महर्षी जमदग्नी समाधी, क्षेत्रपाल झंपटनाथ मंदिर, बजरंगबली, महर्षी कपिल मुनी आश्रम, कपिलेश्वर महादेव मंदिर यांसह विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे.

याशिवाय नागथ्येपी भक्तांचे स्थान, सोनापीर, नवनाथ पीर, पांडव लेणी, भानुतीर्थ, खंडेश्वर देवदेवेश्वर मंदिर, बुडीका आश्रम, कैलास टेकडी, वंजारेेश्वर महादेव, शेख फरीद, दत्तमांजरी जुना वाडा, सर्वतीर्थ, नागेश्वर तसेच महर्षी अत्री व अनुसया माता मंदिर आदी ठिकाणांहून ही परिक्रमा मार्गक्रमण करणार आहे.

या परिक्रमेची सांगता दि. २८ ऑगस्ट रोजी होणार असून, यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन आणि दत्तशिखर संस्थानकडून नियोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता श्री दत्तशिखर संस्थान येथे परिक्रमा यात्रेनिमित्त आढावा व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार अभिजीत जगताप यांनी संबंधित विभागप्रमुखांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आवश्यक सोयी-सुविधांचे योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने माहूर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.