Ticker

6/recent/ticker-posts

पाटोदा (बु) मुलींसाठी अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी

पाटोदा बुद्रुकच्या मुलींसाठी अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी
किनवट : पाटोदा बु. येथील मुलींना शिक्षणासाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवास करावा लागत असून, सध्या सुरू असलेली बससेवा अपुरी पडत असल्याने मुलींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाटोदा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या किनवट आगार व्यवस्थापकांकडे मुलींसाठी स्वतंत्र अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. वैदिका गणेश उडके यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले. यापूर्वीही १७ जुलै २०२६ रोजी याच मागणीचे निवेदन देण्यात आले होते.

निवेदनात नमूद केल्यानुसार, पाटोदा बु. येथून मोठ्या संख्येने मुली शिक्षणासाठी दररोज प्रवास करतात. सध्या सुरू असलेली बस गर्दीने भरलेली असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे अनेक मुलींना बसमध्ये जागा मिळत नसून, गर्दीमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत आहे.

शिक्षणासाठी नियमित प्रवास करणाऱ्या मुलींची संख्या लक्षात घेता सध्याची बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे पाटोदा बु. येथील मुलींसाठी स्वतंत्र अतिरिक्त बस सुरू करावी तसेच विद्यार्थिनींच्या शाळा व महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसची वेळ निश्चित करून नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हिताचा आणि सुरक्षिततेचा विचार करून या मागणीस तातडीने मान्यता देऊन नवीन बससेवा सुरू करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.