Ticker

6/recent/ticker-posts

आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली शेतपांदण रस्त्यांचा आढावा; कामांना गती देण्याच्या सूचना

किनवट–माहूरमधील शेतपांदण रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचना
मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
किनवट : मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत किनवट–माहूर तालुक्यातील शेत पांदण रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
यावेळी बी. सरवनन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. बैठकीत किनवट व माहूर तालुक्यातील शेत पांदण रस्त्यांच्या सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही व सुकर मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

शेत पांदण रस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, पावसाळ्यात तसेच पीक वाहतुकीच्या काळात या रस्त्यांची आवश्यकता अधिक भासते. त्यामुळे प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार भीमरावजी केराम यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस पांदण रस्ता समितीचे सहअध्यक्ष श्री. बाबुराव केंदे, किनवट तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर माहूर तहसीलदार श्री. अभिजित जगताप, समिती सदस्य श्री. कांतराव घोडेकर, श्री. विलास चौधरी, श्री. जगदीश नलमेलवार, श्री. सागर पिसारीवार, श्री. एस. के. नेमानीवार यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत पांदण रस्त्यांची कामे प्रभावीपणे, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्यामुळे किनवट–माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक चांगली रस्ते सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.