Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिवस 30 डिसेंबरला बुलढाण्यात संपन्न होणार

पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी व सुरक्षिततेसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ चा आठवा वर्धापन दिवस दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा वर्धापन दिन केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता पत्रकारांच्या संघर्ष, एकजूट आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरणार आहे.

पत्रकारिता ही समाजपरिवर्तनाची प्रभावी शक्ती असली तरी आज अनेक पत्रकार आर्थिक अडचणी, सामाजिक असुरक्षितता, दबावतंत्र, खोटे गुन्हे, हल्ले व मानहानीसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांना संघटित बळ देण्याच्या उद्देशाने आदरणीय विजय सूर्यवंशी, संस्थापक-अध्यक्ष यांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला हा संघ आज राज्यभर पत्रकारांसाठी विश्वासार्ह आधार बनला आहे.
संघाच्या कार्याला बाळासाहेब आडांगळे, कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाची मजबूत साथ लाभत असून संघ अधिक संघटित व प्रभावीपणे कार्यरत आहे. अल्पावधीतच संघाने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्येही आपली ठळक ओळख निर्माण केली आहे.
चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला यांसह पुणे, मुंबई, रायगड, नाशिक, नांदेड, बुलढाणा आदी जिल्ह्यांत संघाने ग्रामीण, तालुका व जिल्हास्तरावरील पत्रकारांना एकत्र आणत कायदेशीर मार्गदर्शन, सामाजिक संरक्षण, प्रशिक्षण आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पत्रकारांवरील हल्ले, दबाव, खोटे गुन्हे आणि उपेक्षेविरोधात संघाने नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
“संघटित पत्रकारच सुरक्षित पत्रकार” हा संदेश संघाच्या कार्यातून प्रभावीपणे समाजात पोहोचवला जात आहे.
आठव्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा, वर्षभरातील कार्याचा लेखाजोखा, पत्रकार सन्मान, मार्गदर्शनपर भाषणे तसेच संघटनेच्या भावी दिशेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संघाच्या ताकदीचे, संघटनात्मक एकजुटीचे आणि पत्रकारितेच्या स्वाभिमानाचे दर्शन घडवणारा ठरणार आहे.
हा वर्धापन दिन विष्णू कंकाळ, राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असून, राज्यभरातील पदाधिकारी, मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक वर्धापन दिनास महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनोज मोडक, विदर्भ विभागीय अध्यक्ष यांनी केले आहे.